ब्रेकिंग : शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील पैशाने भरलेले एटीएम मशीन चोरले!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील पोलन पेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी कारवाई करत एटीएम मशीनच उचलून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत हरिष विजय गांधी (वय ३७), ब्रांच मॅनेजर, Equitas Small Finance Bank यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पोलन पेठ येथील सत्यम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर बँकेची शाखा व संलग्न एटीएम केंद्र आहे. दि.२ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त बँक बंद असल्यामुळे पुढील दोन दिवसांसाठी एटीएममध्ये एकूण १० लाख रुपयांची रोकड भरण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी बँक नियमित वेळेत बंद करून कर्मचारी घरी गेले.
जाड दोर बांधून चोरले मशीन
दरम्यान, दि. ३ एप्रिल रोजी पहाटे १.२५ ते १.३५ वाजण्याच्या दरम्यान चार अज्ञात इसमांनी एटीएममध्ये प्रवेश केला. एका इसमाने चेहऱ्यावर कापड बांधून एटीएम मशीनला जाड दोर बांधला व बाहेरून वाहनाच्या साहाय्याने ते ओढून खाली पाडले. त्यानंतर इतर तीन साथीदारांच्या मदतीने मशीन उचलून चारचाकी वाहनात टाकून पसार झाले.
१० लाखांचा ऐवज चोरी
घटनेनंतर एटीएम केंद्रातील काचा फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात चार संशयित दिसून येत आहेत. या चोरीत सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे एटीएम मशीन व त्यामध्ये असलेली अंदाजे ७ लाख रुपयांची रोकड असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
तपास पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि मध्यवर्ती भागात ही घटना घडली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.





