
आठ वर्षांची प्रतिक्षा संपली; पोलिसांकडून आई-वडिलांना ‘सरप्राईज गिफ्ट’, मुलाला पाहताच डोळ्यांत आले आनंदाश्रू
२०१७ साली रागाने घर सोडलेला मुलगा बीडमध्ये पालकांच्या मिठीत
बीड : आई-वडिलांचा आठ वर्षांचा आक्रोश आणि शोध अखेर संपला. शिक्षणासाठी घरापासून दूर ठेवलेला मुलगा दहावीत असताना रागाच्या भरात घर सोडून गेला आणि आठ वर्षांनी पोलिसांनी त्याला शोधून पालकांच्या कुशीत परत आणले. हा क्षण इतका भावनिक होता की पोलिसांसह उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.
राजू काकासाहेब माळी (वय २४, रा. खळवट लिमगाव, ता. वडवणी) याचे आई-वडील ऊसतोड मजूर. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी त्याला नाळवंडी (ता. बीड) येथे ठेवले होते. मात्र २०१७ साली शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्यांच्या तगाद्यामुळे तो रागाच्या भरात निघून गेला. कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही. शेवटी २०२३ साली पिंपळेनर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
दोन दिवसांपूर्वी तो पुण्यात असल्याचे पोलिसांना समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत त्याला बीडला आणले. शुक्रवारी पोलिसांनी राजूच्या आई-वडिलांना तपासासाठी बोलावले. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासमोर चर्चा सुरू असतानाच, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी ‘सरप्राईज’ म्हणून राजूला आत आणले. मुलाला पाहताच आईने त्याला मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
घर सोडल्यापासून राजूने पुण्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी केली, नंतर वेल्डिंगचे काम शिकून गुजरातला गेला. आठवडाभरापूर्वी तो पुन्हा पुण्यात आला आणि तिथून पोलिसांनी त्याचा माग काढला. आठ वर्षांनी झालेल्या या ‘फिल्मी स्टाईल’ पुनर्मिलनाने बीड पोलिस ठाण्यातील वातावरण भावनांनी ओथंबून गेले.






