
कजगाव येथे उमंग महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कजगाव (ता. भडगाव) – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत “उमंग महिला प्रभाग संघाची” वार्षिक सर्वसाधारण सभा कजगाव येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थिती लावली.
या वेळी संत सावता महाराज मंगल कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत महिला बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी महिलांना व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आवश्यक अशा मार्गदर्शक सूचना दिल्या. तर, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी महिलांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध महिला बचत गटांनी मसाले, हळद पावडर, लोणचं, कुरडई, पापड आदी वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभारले होते. बोदर्डे, गुढे, निंबु, पाथराड आदी गावांतील महिला गटांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता.
या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून ३५ महिला बचत गटांना एकूण दीड कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू व किराणा साहित्य वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी के. बी. अंजने, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई, सरपंच रघुनाथ महाजन यांच्यासह अनेक मान्यवर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकडोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रशांत महाले, पवन राठोड, सचिन महाजन यांच्यासह अभियानातील कॅडर व महिला बचत गटांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.