इलेक्ट्रिक काट्यात फेरफार करून ३० क्विंटल कपाशी कमी मोजून फसवणूक

इलेक्ट्रिक काट्यात फेरफार करून ३० क्विंटल कपाशी कमी मोजून फसवणूक
दोन व्यापाऱ्यांविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा
भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा व कोठली येथील दोन कपाशी व्यापाऱ्यांनी लोण पिराचे परिसरातील शेतकऱ्यांची इलेक्ट्रिक वजनकाटा वापरून तब्बल ३० क्विंटल कपाशी कमी मोजत सुमारे ₹२,०३,३०६ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खोटेपणा समोर येताच दोन्ही व्यापारी पिकअप गाडी व वजनकाटा घटनास्थळीच सोडून फरार झाले. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. घटनेमुळे परिसरातील शेतकरीवर्गामध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
सविस्तर माहिती अशी लोण पिराचे येथील शेतकरी विजय नारायण पाटील (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत गावातील सार्वजनिक ठिकाणी आरोपी राजेंद्र यशवंत पाटील (रा. निंभोरा) व नाना राजधर पाटील (रा. कोठली) हे कापूस खरेदीसाठी आले होते. इलेक्ट्रिक वजन काट्यात फेरफार करून त्यांनी फिर्यादी आणि इतर शेतकऱ्यांची एकूण २९.८९ क्विंटल कपाशी कमी मोजून तब्बल ₹२,०३,३०६ रुपयांची फसवणूक केली.
फसवणूक उघड होताच दोन्ही व्यापारी आपली पिकअप मालवाहतूक गाडी (एमएच १९ बीएम २८३६), तसेच कपाशी मोजण्यासाठी आणलेला इलेक्ट्रिक वजनकाटा घटनास्थळीच सोडून पळून गेले. त्यानंतर शेतकऱ्यांनी हा मुद्देमाल भडगाव पोलिसांकडे जमा केला.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४४३/२०२५, भा.दं.वि. कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.
शेतकऱ्यांची तब्बल ३० क्विंटल कपाशीची फसवणूक झाल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरीवर्गात संताप व्यक्त होत आहे. “अशा लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.





