
महा पोलीस न्यूज । दि.२० नोव्हेंबर २०२५ । भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ दरम्यान कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतील काही शिक्षक व कर्मचारी एका उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत लखीचंद प्रकाश पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगासह विविध शासकीय विभागांना लेखी तक्रारी केल्या आहेत.
लखीचंद पाटील यांच्या तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक ८(अ) हा महिलांसाठी राखीव असून या प्रभागातून लखीचंद पाटील यांच्या पत्नी समीक्षा पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्याच प्रभागातून पूनम प्रशांत पाटील यांचा भाजपकडून उमेदवारीचा अर्ज दाखल असून त्या समीक्षा पाटील यांच्या प्रतिस्पर्धी आहेत.
पाटील यांनी आरोप केला आहे की, पूनम पाटील या कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील यांच्या कन्या असून संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत वापर केला जात आहे. उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी, अर्ज दाखल करणे, छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थिती, तसेच प्रभागात फिरून प्रचार करण्यासाठी कर्मचारी नेमले जात असल्याचा दावा तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीत असेही म्हटले आहे की, काही कर्मचारी शाळेत हजर असल्याचे दाखवत कार्यालयीन वेळेतच निवडणूक प्रचारात सहभागी होत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. शासकीय अनुदानित संस्थेतील कर्मचारी शासनाचा पगार घेऊन राजकीय प्रचारात गुंतले असल्याने कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात पाटील यांनी तक्रारीमध्ये व्हिडीओसह पुरावे जोडल्याचे म्हटले आहे. ही तक्रार राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भडगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच पंचायत समितीतील संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे.





