भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी, जाणून घ्या रूपरेषा..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सकल ब्राह्मण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरलेल्या भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाची तयारी यंदा उत्साहात अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या उत्सवाने जळगावातून सुरू होत महाराष्ट्रभर विस्तार घेतला असून गावागावांत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.
समाजातील सर्व शाखा व भाषिक भेद बाजूला ठेवून वर्षातून एकदा एकत्र येण्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवासाठी यंदा ४०० हून अधिक स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे आयोजनाला मोठी ताकद मिळत आहे.
उत्सवाची सुरुवात ५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने झाली. यानंतर रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाबळ चौकातून विराट मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पोलिस मल्टीपरपज हॉल येथे समाप्त होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता दानदाते व श्रमदाते यांचा गौरव सोहळा पार पडणार आहे.
मुख्य कार्यक्रम रविवार, १९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिरात परशुराम पूजन होईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. या शोभायात्रेत आकर्षक भगवान परशुराम रथ, ढोल-ताशा, लेझीम, दांडिया पथके तसेच महिलांचे तलवारबाजी व दांडपट्टा प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण असणार आहे. हजारो भाविकांच्या सहभागाने निघणारी ही शोभायात्रा शिवतीर्थावर समारोप पावणार आहे.
उत्सवात दरवर्षी काहीतरी नावीन्य आणण्याची परंपरा कायम ठेवत यंदा पारंपरिक निमंत्रणपत्रिकेऐवजी २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेत शास्त्रशुद्ध तिथींसह ब्राह्मण समाजातील विविध कुळांची माहिती व समाजोपयोगी माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. ही दिनदर्शिका प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात येत असून, ज्यांना मिळाली नसेल त्यांच्यासाठी शिवतीर्थावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दरम्यान, वर्षभर विविध व्याख्याने व स्नेहसंमेलनांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व गंधे सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यमान अध्यक्ष प्रतिथयश विधीज्ञ ॲड ओम त्रिवेदी, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष प्रतिथयश आर्किटेक्ट नितीन पारगावकर, सहसचिव पंकज पवनीकर, माजी अध्यक्ष सुरेद्र मिश्रा, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाल पंडीत, व महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड, नूतन अध्यक्षा पूनम तिवारी, सचिव मानसी जोशी, प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर उपस्थित होते.
या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाज एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






