भूजल पुनर्भरण अभियानाचा १२वा वर्षी शुभारंभ; जनजागृतीसह जलसंवर्धनाला चालना

भूजल पुनर्भरण अभियानाचा १२वा वर्षी शुभारंभ; जनजागृतीसह जलसंवर्धनाला चालना
जळगाव : भरारी फाउंडेशन आणि क्रेडाई जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल पुनर्भरण अभियानाचा १२वा वर्षीचा प्रारंभ २८ एप्रिल रोजी झाला. हे अभियान २८ एप्रिल ते २० जून या दोन महिन्यांत राबवले जाणार असून, भूजल पातळीतील घट आणि पाण्याच्या भविष्यातील संकटावर उपाय म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देण्यात येणार आहे. या मोहिमेत पावसाळ्यात छताचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी चित्ररथाद्वारे शहरभर जनजागृती केली जाईल, तर नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.अभियानांतर्गत पावसाच्या पाण्याचा विनियोग आणि भूजल पातळी वाढवण्यावर दोन महिने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी लघू चित्रपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि पथनाट्यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौकात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाला सुरुवात झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील मोकळ्या जागांमध्ये शोषखड्डे खणून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. क्रेडाईचे अनिश शहा यांनी नवीन बांधकामांसाठी भूजल पुनर्भरण यंत्रणा सक्तीच्या करण्याची आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली.या अभियानात भूजल पुनर्भरण यंत्रणा बसवणाऱ्या दहा नागरिकांचा ‘जलरत्न’ सन्मानाने गौरव करण्यात आला. सन्मानितांमध्ये रवींद्र लढ्ढा, नरेंद्र चौधरी, लखीचंद जैन, जितेंद्र चौहान, प्रदीप अहिरराव, शंतनू चौधरी, मनीषा पाटील, शुभश्री दप्तरी, निलेश झोपे आणि रोहिणी देशमुख यांचा समावेश आहे.सोहळ्याला आमदार सुरेश भोळे, अनिश शहा, डॉ. पी. आर. चौधरी, धनंजय जकातदार, अनिल कांकरिया, रवींद्र लढ्ढा, दीपक सराफ, आदर्श कोठारी, चित्रा चौधरी, सपन झुनझुनवाला, अनिल भोकरे, अमर कुकरेजा, विजय वाणी, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक एस. आर. पाटील, प्रविण पाटील उपस्थित होते. अक्षय सोनवणे, सागर पगारीया, निर्णय चौधरी, सागर परदेशी, निलेश पाटील आणि रोहिणी मोरडिया यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी केले, तर आभार दीपक सराफ यांनी मानले.