रेल्वेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; धमकी देत सोशल मीडियावर बदनामी

रेल्वेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; धमकी देत सोशल मीडियावर बदनामी
भुसावळ : रेल्वेतील एका ३५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून, धमकी देत तिची सोशल मीडियावर बदनामी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे
शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात राहणारी महिला रेल्वे विभागात कार्यरत आहे. संशयित अब्दुल रहिम शेख (वय २७, रा. भुसावळ) याने १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत महिलेचा पाठलाग करत “माझ्याशी संबंध ठेव” असा आग्रह धरला. महिलेने नकार दिल्यानंतर त्याने “फोटो व्हायरल करीन” अशी धमकी देत पैशांची मागणी केली.
महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर संशयिताने अंगावर अॅसिड टाकण्याची तसेच तिच्या पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागला
महिलेने विरोध केल्यानंतर संतप्त संशयिताने महिलेचे आणि तिच्या मित्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने अखेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली
तक्रारीच्या आधारे अब्दुल रहिम शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.