
तीन मोटारसायकल चोरांना अटक, ९ मोटारसायकली जप्त
पाथर्डी पोलिसांची धडक कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी पाथर्डी पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत तीन सराईत मोटारसायकल चोरांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण नऊ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ₹४,३०,००० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, हंडाळवाडी (ता. पाथर्डी) येथील महेश भगवान खोदे यांची टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री चोरीस गेली होती. या प्रकरणी फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनीच सदर वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
अस्पाक इसाक पठाण (वय ३०, रा. पाडळी, ता. पाथर्डी) , गणेश राजेंद्र साळुंके (वय २५, रा. पाडळी, ता. पाथर्डी) अशी या आरोपींची नावे असून या दोघांकडून फिर्यादीची मोटारसायकल जप्त केल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी आठ मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. पुढील तपासात या वाहनांची विक्री मच्छिंद्र भानुदास शिंदे (वय ३१, रा. चितळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) या व्यक्तीमार्फत केली असल्याचे उघड झाले. त्यालाही पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून आठ मोटारसायकली जप्त केल्या.
एकूण जप्त वाहनांमध्ये हिरो स्प्लेंडर, टीव्हीएस स्टार सिटी, होंडा शाईन अशा विविध कंपन्यांच्या ९ मोटारसायकलींचा समावेश आहे. प्रत्येक वाहनाची किंमत सुमारे ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक मा. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. निरज राजगुरू (शेवगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोहे.कॉ. बाबासाहेब बडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, सागर बुधवंत, संजू जाधव आणि धनराज चाळक या पोलिस पथकाने विशेष भूमिका बजावली.






