भुसावळ रेल्वे स्थानकावर एक कोटींच्या नकली नोटांचा पर्दाफाश

भुसावळ रेल्वे स्थानकावर एक कोटींच्या नकली नोटांचा पर्दाफाश
भुसावळ ;- भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संशयितांच्या बॅगेत या नकली नोटा सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.
मलकापूरहून भुसावळकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांवर रेल्वे पोलिसांना संशय आला. त्यांची तपासणी केली असता बॅगेत सुमारे एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळल्या. तपासणीदरम्यान एकजण फरार झाला असून दुसऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बॅगेत आढळलेल्या पाचशे रुपयांच्या बंडलमध्ये वरची एक नोट खरी असली तरी उर्वरित नोटा ‘चिल्ड्रन बँक’ लिहिलेल्या नकली असल्याचे आढळले. या प्रकाराने रेल्वे पोलिस अधिक सतर्क झाले असून तपास अधिक गतीने सुरू आहे.
नकली नोटा सापडल्यामुळे रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी लवकरच अधिक तपशील उपलब्ध होण्याची शक्यता आहे.