Detection

भुसावळ ड्रग्स कनेक्शन व्हाया कुलाबा : चौकडी पोलिसांच्या जाळ्यात, ७३ लाखांचे ड्रग्स जप्त

महा पोलीस न्यूज | २० मार्च २०२४ | जळगाव जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ आणि अवैध अग्निशस्त्राविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून अडीच महिन्यात २५ पेक्षा अधिक गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहे. तसेच गेल्या आठवड्यात ९०० किलो गांजा पकडण्यात आल्यानंतर मंगळवारी भुसावळ शहरात तब्बल ७३ लाखांचे ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगाव एलसीबीच्या पथकाने एक गावठी कट्टा देखील हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील हॉटेल मधुबनच्या जवळ कुणाल भरत तिवारी, वय ३० वर्षे, रा.प्लॉट नं.२४, तापी नगर, भुसावळ, जोसेफ जॉन वालाड्यारेस, वय २८ वर्षे, रा.रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगांव रोड, भुसावळ हे मानवी जिवीतास अपायकारक अंमली हा अमली पदार्थ विना परवाना बेकायदेशीररित्या विक्री करीता स्वताच्या कब्जात बाळगतांना मिळून आले. म्हणुन फिर्यादी पोलीस कर्मचारी प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम. ८ (क), २१(क), २२ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुसावळ शहरात गुंगीकारक औषधीद्रव्ये मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याची गोपनीय माहिती काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल मधुबन येथे संशईत इसम नामे कुणाल भारत तिवारी, वय ३० वर्षे, रा. प्लोट नं. २४ तापी नगर, भुसावळ, जोसेफ जॉन वालाड्यारेस. वय २८ वर्षे, रा.रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगांव रोड, भुसावळ हे अंमली पदार्थ स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पथकाला मिळाली होती. म्होरक्याला जाळ्यात अडकविण्यासाठी आणि मोठा साठा जप्त करण्यासाठी पोलिसांनी सापळ्याचे नियोजन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शाखाली सापळा रचून सलग तीन महिने एका पंटर मार्फत ड्रग्सची पुडी खरेदी करण्यात आली. विक्रेत्यांचा विश्वास संपादित केल्यावर मोठा माल पाहिजे असल्याचे त्याला सांगितले. मंगळवारी पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी त्यांचे पथक आणि सोबत दोन शासकीय पंच अशांनी बनावट ग्राहक पाठवून संशयीत आरोपी कुणाल तिवारी व जोसेफ जॉन वलाड्योमर यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली. अंग झडतीमध्ये ९१० ग्रॅम Methaqualone सफेद रंगाचे दाणेदार पदार्थ मिळून आला असुन त्याची एकूण किंमत ७२ लाख ८० हजार एवढी आहे.

ड्रग्सची घटनास्थळावरच जळगांव फॉरेन्सिक युनीटच्या तज्ञांमार्फत प्राथमीक रासायनिक तपासणी केली असता तो पदार्थ हा Methaquilon नावाचा मानवी जिवीतास अपायकारक ठरणारा अंमली पदार्थ असल्याची खात्री करण्यात आली. गुन्ह्याचा अधिक तपास करताना सर्व ड्रग्स तिसरा आरोपी दिपेश मुकेश मालवीय, रा.शेर ए पंजाब हॉटेल वरणगाव रोड भुसावळ याने विक्री करीता पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील अटक केली. दिपेशची चौकशी केल्यावर कुलाबा, मुंबई येथील मृदुल चंपकलाल वैद्य याचे नाव समोर आले. पथकाने मुंबई येथून त्याला ताब्यात घेतले. दिपेश आणि मृदुल मुंबई येथे एका दुकानात कामाला असताना त्यांची ओळख झाली आणि तिथेच कॉलगर्ल्सच्या माध्यमातून ते ड्रग्सच्या व्यवसायात उतरले.

पोलिसांनी मृदुल वगळता तिन्ही आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता आरोपींची २ दिवस पोलीस कोठडी प्राप्त झाली आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मंगेश जाधव व कर्मचारी योगेश महाजन असे करीत असून स्वतंत्र पथकामार्फत इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, दिपेशच्या माध्यमातून भुसावळ शहरात फ्री सँपल देण्यात येऊन अंदाजे ५०० पेक्षा अधिक तरुण, तरुणी, महिलांना ड्रग्सच्या व्यसनात अडकविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिपेश मालवीय याच्याविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल आहेत.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक मंगेश जाधव तसेच डीबी पथकातील अंमलदार हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी योगेश महाजन, प्रशांत परदेशी, जावेद शाह, राहुल वानखेडे, भुषण चौधरी, अमर आढाळे यांनी ही कारवाई केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button