
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । रेल्वे रुळालगत दुर्गम ठिकाणी सापडलेला एक मृतदेह, घटनास्थळी कोणताही पुरावा नाही, मोबाईल लोकेशनचा धागा नाही, हत्येचे शस्त्रही नाही आणि कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नाही… अशा पूर्णपणे अंधारात असलेल्या हत्येच्या गुन्ह्याचा भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात थरारक पद्धतीने उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरीच्या वादातून ५५ वर्षीय संतोष रघुवीर मंचाल यांची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२८ जूनच्या रात्री घडली घटना
दि.२८ जून रोजी रात्री भुसावळ शहराजवळ रेल्वे लाईनलगत असलेल्या दुर्गम भागात संतोष रघुवीर मंचाल (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आला. कोणाशीही विशेष वैर नसलेल्या या व्यक्तीची अशा प्रकारे हत्या कोणी आणि का केली, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासासमोर मोठे आव्हान
या गुन्ह्यात पोलिसांकडे तपासासाठी जवळपास कोणताही आधार नव्हता. घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मोबाईल लोकेशन किंवा इतर तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते. घटनास्थळावर कोणतेही भौतिक पुरावे किंवा हत्यार मिळाले नव्हते. यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोकला तळ
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तसेच भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी आपल्या ‘ह्युमन इंटेलिजन्स’ अर्थात गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय केले.
पोस्टमॉर्टममधून मिळाला पहिला धागा
पोस्टमॉर्टम अहवालात मृताच्या जबड्यावर आणि बरगड्यांवर जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे कोणत्याही हत्याराचा वापर झालेला नव्हता. यावरून पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला की, मारहाण करणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत, बॉक्सर किंवा खेळाडू असू शकते.
हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ ठरला गेमचेंजर
दरम्यान, डीबी स्टाफला महत्त्वाची माहिती मिळाली. घटनेच्या रात्रीच एका हळदी समारंभात झालेल्या वादाचा व्हिडिओ समोर आला होता. त्या व्हिडिओमध्ये एका तरुणाला जबर मारहाण करणारा हर्षल राजू वर्मा हा युवक दिसत होता. परिसरात तो एक बॉक्सर म्हणून ओळखला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच धाग्यावर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
चौकशीत उघड झाला खून
हर्षल वर्माची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. प्रारंभी आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवी अधिकाऱ्यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांच्या कथांतील विसंगती उघड झाल्या आणि अखेर त्यांनी संतोष मंचाल यांच्या हत्येची कबुली दिली. तपासात हर्षल राजू वर्मा, क्षितिज (शितीज) संजय भालेराव आणि प्रफुल्ल उत्तम जाधव या तिघांचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
रेल्वे स्क्रॅप चोरीच्या वादातून खून
आरोपींच्या कबुलीजबाबानुसार, ते रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. त्याचवेळी संतोष मंचाल तेथे पोहोचले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपींनी संतोष मंचाल यांना जबर मारहाण केली. विशेषतः बॉक्सर असलेल्या हर्षल वर्माने केलेल्या जोरदार मारहाणीमुळे संतोष मंचाल यांचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले.
संशयीत आरोपींची माहिती
हर्षल राजू वर्मा (वय १९) – सम्राट बॉक्सिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणारा बॉक्सर, शिक्षण : बारावी (कला शाखा)
क्षितिज (शितीज) संजय भालेराव (वय १९) – बारावी (कला शाखा), आयटीआय उत्तीर्ण.
प्रफुल्ल उत्तम जाधव (वय २१) – बारावी (वाणिज्य शाखा)
‘ह्युमन इंटेलिजन्स’ची ताकद पुन्हा सिद्ध
या संपूर्ण तपासात कोणतेही तांत्रिक किंवा भौतिक पुरावे नसतानाही पोलिसांनी पोस्टमॉर्टममधील निरीक्षण, माहितीदारांचे जाळे आणि कौशल्यपूर्ण चौकशी यांच्या आधारे अवघ्या २४ तासांत हत्येचा उलगडा केला. त्यामुळे भुसावळ पोलिसांच्या तपास कौशल्याची आणि खाकी वर्दीतील प्रभावी टीमवर्कची पुन्हा एकदा प्रचिती आली.





