Crime

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : १३ गावठी कट्टे, ३० काडतूस पकडले, म्होरक्या गवसला

महा पोलीस न्यूज | ११ मार्च २०२४ | जळगाव जिल्हा पोलिसांनी रविवारी दमदार कामगिरी केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान एकाला अटक केली असून त्याच्याकडून ४ गावठी पिस्तूल, १० काडतूस, ५ मॅगझीन असे हस्तगत करण्यात आले आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी आणखी जबरदस्त कामगिरी केली असून जंगलात सापळा रचून चौघांना अटक करीत ९ गावठी कट्टे, २० काडतूस, २ मॅगझीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. दोन्ही पथकांना पोलीस अधीक्षकांनी लागलीच बक्षीस देखील दिले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले आदींसह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

चाळीसगाव पोलिसांनी पकडले ४ पिस्तूल, ५ मॅगझीन व १० जिवंत काडतूस
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे रोड, तेजस कोनार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान धुळ्याकडून मोटारसायकल क्रमांक एमएच.१२.व्हीएक्स.३००८ हिचेवरुन चाळीसगावचे दिशेने दोन इसम येत होते. नाकाबंदी सुरु असलेली पाहून गाडी चालविणा-या तरुणाने काही अंतरावर मोटार सायकल थांबविली. तेव्हा पाठीमागे बसलेला तरुण गाडीवरुन उतरुन धुळे रोडच्या आजुबाजूचे रहिवाशी परीसरात पळून गेला. त्यामुळे पोलीस स्टाफने पळत जावून मोटार सायकल चालवित असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारणा केली असता त्याने स्वतःचे नाव आमीर आसीर खान, वय २०, रा.काकडे वस्ती, कोढंवा, पुणे व त्याचे सोबत असलेल्या इसमाचे नाव आदित्य भोईनल्लु, रा.पुणे असे सांगितले.

पथकाने आमीर आसीर खान याची बॅग तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचे ४ पिस्टल, ५ मॅगझीन व १० जिवंत काडतुस, एक मोटार सायकल असा एकुण २ लाख १ हजाराचा शस्त्रसाठा व मुद्देमाल मिळून आला आहे. दोन्ही आरोपींचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.क्रं. ११०/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३/२५, भादवि कलम ३४ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लघंन १३७ प्रमाणे पोकों ३३६३ पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयातील मिळून आलेला आरोपी आमीर आसीर खान याचेकडे केलेल्या तपासात तो शरीराविरुध्द गंभीर गुन्हे करणारा सराईत, तडीपार असलेला गुन्हेगार असुन समर्थ पोलीस स्टेशन गुरनं. २१८/२०२३ भादवि कलम ३०२, ३०७ सह सघंटीत गुन्हेगारी अधिनियम प्रमाणे दाखल गुन्हयात मागील ६ महिन्यापासुन फरार आहे. त्याचेवर एकुण ६ गंभीर गुन्हे दाखल असून त्याला पुणे जिल्हयातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीचा साथीदार आदित्य भोईनल्लु, रा. पुणे हा फरार असुन त्याचा देखील शोध सुरु आहे. नमुद आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कोठून आणला? व त्यांनी काही घातपाती कारवाया करण्याचा कट रचला आहे काय? याबाबत तपास सुरु आहे.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सागर एस.ढिकले, पोउपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, हवालदार राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील या पथकाने कारवाई केली असून पुढील तपास पोउपनिरीक्षक सुहास आव्हाड, प्रकाश पाटील, उज्वलकुमार म्हस्के हे करीत आहेत.

चोपडा पोलिसांच्या बंदूक विक्रेता, मध्यस्थी, खरेदीदार जाळ्यात
चोपडा शिवारातील कृष्णापुर परिसरात उमर्टी रोडवरील घाटात दोन व्यक्ती गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्रीचे डिलींग करणार असल्याची माहीती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पथकाने सापळा लावला असता कृष्णापुर ते उमर्टी रस्त्यावर डोंगराळ भागातील कच्चा रस्त्यावरील घाटातील मंदीरापासून थोडे पुढे उमर्टी गावाकडेस चढतीजवळ दोन मोटार सायकलींवरील ४ इसमांकडे गोणीमध्ये काहीतरी असल्याचे संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकून त्यांना जागीच पकडण्यात आले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी हरजनसिंग प्रकाशसिंग चावला वय-२० वर्ष,रा, पारउमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, (म.प्र), मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला वय-२० वर्षे, रा. पारउमटी, ता.वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), अलबास दाऊद पिंजारी वय-२७ वर्ष,रा. महादेव चौक बाजार पेठ, हरिविठ्ठल नगर, जळगाव ता.जि.जळगांव, अर्जुन तिलकराज मलीक वय-२५ वर्षे, रा.एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, रा.पंजाब असे असल्याचे सांगीतले.

पथकाने चौघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या गोणीमध्ये ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व २ रिकाम्या मॅगझीन असा मुद्देमाल मिळून आला. गोणी ताब्यात घेत असतांना चौघांनी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जाण्यासाठी हुज्जत घालून पोलीस कर्मचा-यांशी हातापायी करुन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यांच्या ताब्यातील २ मोटार सायकल क्रमांक एमएच.१९.ईएफ.३७९३, एमपी.६९.एमए.१८४८, ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, २ रिकाम्या मॅग्झिन, ४ मोबाईल हेण्डसेट असा एकूण ४ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर, हवालदार शशीकांत पारधी, दीपक शिंदे, किरण पाटील, गजानन पाटील, संदिप निळे, होमगार्ड थावऱ्या बारेला, सुनिल धनगर, श्रावण तेली, संदिप सोनवणे यांनी केली आहे. संशयीत आरोपी अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा.महादेव चौक बाजार पेठ, हरिविठ्ठल नगर जळगाव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात एकुण ९ ते १० गुन्हे दाखल आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button