Big Breaking : जळगाव एमआयडीसीत तयार होत होती बनावट दारू!
महा पोलीस न्यूज | ४ मे २०२४ | जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या के सेक्टरमध्ये आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सच्या नावाखाली देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहाटे ३ वाजता छापा टाकला असून लाखो रुपयांची बनावट दारू, मशीन आणि कच्चा माल जप्त केला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील भेट देऊन पाहणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी परिसरातल्या के सेक्टरमध्ये मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या नावाने कंपनी सुरू होती. यात विविध प्रकारचे आयुर्वेदिक, शक्तिवर्धक औषध तयार करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात येथे रॉकेट देशी दारू या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती. यासाठी येथे रसायनांपासून ते पॅकेजींगची सर्व सामग्री असून यातून मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन करून ते वितरीत करण्यात येत आहे.
शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विठ्ठल भुकन यांनी पथकासह पहाटे २.३० वाजेच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. कंपनीचे दरवाजे कुणी उघडत नसल्याने पथकाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी काच फुटल्याने एक कर्मचारी जखमी झाला आहे.
पथकाने आतमध्ये पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले. कंपनीत बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार बनावट दारू, पॅकेजिंग करण्याचे मशीन, २ लाख लेबल आणि रिकाम्या बाटल्या असा मुद्देमाल आणि ४ ते ५ कामगार आतमध्ये होते. प्रथमदर्शनी कंपनीत आढळून आलेला मुद्देमाल तब्बल ५० लक्ष ५९ हजार रुपयांचा असल्याची माहिती असून आकडा दीड ते २ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कंपनीत तब्बल ३५ ड्रम भरून दारूचे कच्चे रसायन आणि तयार दारू मिळून आली.
घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरूध्द कार्यवाही सुरू झालेली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. कंपनीतून ३ ट्रक भरून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विठ्ठल भुकन यांच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.