बिग ब्रेकिंग : जिल्हा कारागृहात खुनातील कैद्याचा खून!

महा पोलीस न्यूज । १० जुलै २०२४ । जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांच्यासह कुटुंबाच्या हत्त्या प्रकरणात संशयीत आरोपी कारागृहात होते. दुपारी झालेल्या वादात दुसऱ्या आरोपीने एकाचा खून केला आहे. राज उर्फ मोहसीन असगर खान असे मयत बंदीवान कैद्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली होती. एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता. पुर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.
गुन्ह्यातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
जळगाव कारागृह हे आधी देखील अनेक गैरकृत्यांमुळे कायम चर्चेत असतांना आता थेट जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.






