जळगाव एमआयडीसीत केमीकल कंपनीला भीषण आग, १८ भाजले, ४ बेपत्ता
महा पोलीस न्यूज | १७ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या डब्ल्यू सेक्टर मधील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत बुधवारी सकाळी नऊ वाजता स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगीत १८ जण भाजल्याची तर ४ कामगार बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कंपनीत किती लोक काम करीत होते याची आकडेवारी समोर आली नसून आग अजूनही धगधगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमध्ये मुंबई येथील आदित्य निंबाळकर यांच्या मालकीची मोरया ग्लोबल लिमिटेड ही केमीकल कंपनी आहे. बुधवारी सकाळी कामाची पहिली शिफ्ट सुरू झाल्या नंतर सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी केमीकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांनी बाहेर धाव घेतली. आगीत १८ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून त्यात ६ लोक गंभीर भाजले आहेत. तसेच अद्याप ४ कामगार बेपत्ता असल्याची माहिती आहे. कंपनीत किती लोक काम करीत होते याची माहिती समोर आलेली नाही.
घटनास्थळी सकाळपासून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब रिकामे झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. जळगाव शहर महानगरपालिका, जैन इरिगेशन, धरणगाव नगर परिषद, पाचोरा नगरपरिषद, नशिराबाद नगरपरिषद, जामनेर नगरपरिषद, वरणगाव नगरपरिषद, पारोळा नगरपरिषद, आयुध निर्मानी वरणगावच्या बंबाद्वारे आणि सुप्रीम कंपनी गा येथील पथकाद्वारे आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
घटनास्थळी पूर्णवेळ उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि कर्मचारी लक्ष ठेवून असून जखमींवर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदार संघाच्या महायुती उमेदवार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपा प्रभारी आयुक्त, अधिकारी, प्रांताधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अरविंद देशमुख, जळगाव मनपातील माजी नगरसेवक यांनी भेट देत माहिती जाणून घेतली आहे.
(आम्ही बातमी सतत अपडेट करीत असून अधिक माहितीसाठी बातमी रिफ्रेश करून वाचावी.)