Other

’अंतर्नाद प्रतिष्ठान’ने माथन पाड्यावर फुलवली माणुसकीची दिवाळी

’अंतर्नाद प्रतिष्ठान’ने माथन पाड्यावर फुलवली माणुसकीची दिवाळी

समाजहितासाठी दहाव्या वर्षीही अविरत वाटचाल

प्रतिनिधी :भुसावळ येथील ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’ तर्फे यावल तालुक्यातील माथन आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत ९५ कुटुंबांतील ३२५ मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे, ब्लॅंकेट, रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य, पणत्या, बिस्किट, चॉकलेट, साखर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

‘एक वाटी फराळ आणि नवीन कपडे द्या – वंचितांची दिवाळी गोड करा’ या आवाहनाला दात्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत संकलित साहित्य व फराळ माथन येथील दुर्गम आदिवासी पाड्यावर पोहोचवण्यात आला. यंदा या उपक्रमाचे दहावे वर्ष पूर्ण झाले.

*दुर्गम डोंगरमाथ्यावर पोहोचवली दिवाळी*

सातपुड्याच्या डोंगररांगा, खोल दऱ्या, ओढे, आणि अवघड चढ-उतार पार करत ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांनी या वर्षीची दिवाळी डोंगरमाथ्यावरील पाड्यांपर्यंत पोहोचवली. दुर्गमतेचा अंदाज यावरूनच येतो की, अंधारमळी येथे वाहने थांबवून पुढील सुमारे ७–८ किलोमीटरचा प्रवास दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावा लागला. वाटेत कच्चे रस्ते, ओढे आणि गाळयुक्त चढ उतार अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एक नदी तब्बल १० ते १५ वेळा ओलांडावी लागली, तरीही अंतर्नादच्या कार्यकर्त्यांनी निर्धाराने वाटचाल करत मदत माथनच्या पाड्यावर पोहोचवली.

या कठीण आणि साहसी प्रवासानंतर मदतीचा हात अखेर माथनच्या डोंगरावरील पाड्यावर पोहोचला आणि तेथील आदिवासी कुटुंबांपर्यंत दिवाळीचा उजेड पोहोचला. गेल्या दहा वर्षांपासून प्रतिष्ठान सातत्याने वेगवेगळ्या दुर्गम पाड्यांवर दिवाळी साजरी करत आहे. प्रत्येक वर्षी नवे ठिकाण निवडून मदतीचा विस्तार केला जातो. या कार्यात प्रतिष्ठानच्या सदस्यांसोबत अनेक दाते, स्वयंसेवक आणि स्थानिक तरुणांनी सहभाग घेतला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या डोंगरमाथ्यावरच्या चिमुकल्यांपर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचवण्यात यश आले.

या वेळी प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक योगेश इंगळे, सहसमन्वयक प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, तसेच सदस्य अमितकुमार पाटील, ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, राजू वारके, कुणाल वारके, डॉ. प्रा. श्याम दुसाने, उमेश फिरके, विपिन वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, ललित महाजन, शिरीष कोल्हे, केतन महाजन, हरीश भट, निलेश रायभोळे, हेमंत बोरोले, अतुल चौधरी, शर्वरी पाटील आणि अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.

सातपुड्याच्या दऱ्या–खोऱ्यांतील त्या छोट्याशा माथन पाड्यावर यंदा दिवाळीचा खरा प्रकाश उजळला. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून अखंड राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश केवळ मदत वाटप नव्हे, तर वंचित मुलांपर्यंत आनंदाची किरणे पोहोचवणे हा आहे. नवीन कपडे, फराळ आणि मिठाई हातात मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य संपूर्ण टीमसाठी सर्वात मोठं पारितोषिक ठरलं. “ज्या भागात वीजेचा दिवा क्वचितच पेटतो, त्या ठिकाणी आमच्या हातून दिवाळीचा एक दिवा जरी उजळला, तरी आमचे प्रयत्न सार्थक वाटतात,” अशी भावना प्रकल्प प्रमुख जीवन महाजन यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमात दरवर्षी नवीन पाड्यावर दिवाळी साजरी केली जाते, आणि दरवेळी नव्या चेहऱ्यांवर आनंदाचे फुल उमलताना पाहून आमचाही उत्साह दुणावतो.”

*‘वाटीभर फराळ’ उपक्रम लोकचळवळीकडे*

‘एक वाटी फराळ आणि नवीन कपडे द्या’ या साध्या पण हृदयस्पर्शी संकल्पनेने आता सामाजिक चळवळीचं रूप घेतलं आहे. यंदा शेकडो दात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. कुणी फराळ तयार करून दिला, कुणी नवीन कपडे दिले, तर कुणी आर्थिक मदत केली — अशा सहकार्याच्या एकत्रित भावनेतून ही दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशोत्सव ठरली. “या उपक्रमातून शहरातील नागरिक आणि डोंगर पाड्यांवरील बांधवांमध्ये नाते घट्ट झाले आहे. आगामी काळात हा उपक्रम अधिक व्यापक करून तो लोकचळवळ स्वरूपात राबवू,” अशी ग्वाही प्रकल्प समन्वयक योगेश इंगळे यांनी दिली. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, “दरवर्षी या दिवशी आमच्या पाड्यावर येणाऱ्या अंतर्नाद कार्यकर्त्यांमुळे आमचंही घर उजळतं; त्यांच्या येण्याने खरी दिवाळी साजरी होते.”

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button