मोठी बातमी : बेंडाळे चौकात पकडले अडीच कोटी, मात्र…
महा पोलीस न्यूज । दि.७ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे तशी रोकड अफरातफर करण्याचे प्रमाण वाढत असते. जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौकात गुरुवारी दुपारी ११.३० च्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी एक वाहन अडवले मात्र चौकशी केल्यावर ती रक्कम आर.सी.बाफना ज्वेलर्स यांची असून बँकेत भरणा करण्यासाठी जात असल्याचे निष्पन्न झाले.
जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात गुरुवारी दुपारी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.टी.धारबळे हे पथकासह तपासणी करीत होते. ११.३० वाजेच्या सुमारास सुभाष चौकाकडून पांडे चौकाकडे जात असलेली एक कार पोलिसांनी अडवली. वाहनाची तपासणी करताना त्यात २ कोटी ५३ लाख रोकड आढळून आली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सर्व रक्कम आर.सी.बाफना ज्वेलर्स यांची होती आणि बँकेच्या प्रतिनिधीसह ते भरणा करण्यासाठी जात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी पडताळणी केल्यावर रोकडसह वाहन सोडून देण्यात आले.