मोठी बातमी : डॉ.अश्विन सोनवणे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
महा पोलीस न्यूज । दि.२४ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरासाठी मी अर्ज दाखल करणार आहे. जळगावात विकास रखडला असून मी त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जळगाव शहरात १० वर्षात आमदारांनी काम केले नाही. मला त्रास देण्यात आला. उपमहापौर असताना आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष निवडीवेळी मला डावलण्यात आले. मी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. माझा निर्णय ठाम असून दि.२८ किंवा २९ रोजी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून आ.राजूमामा भोळे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडून माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून डावलण्यात आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करीत असलेले माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
डॉ.अश्विन सोनवणे पुढे म्हणाले की, भाजपात अनेकजण नाराज असून मी सर्व नाराजांची भेट घेणार आहे. सर्वांना मतदानासाठी आवाहन करणार आहे. विद्यमान आमदार पक्ष सोडून दोन वेळा काँग्रेसमध्ये गेले आणि पुन्हा भाजपात आले तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली. मी २५ वर्षापासून एकनिष्ठ असून देखील डावलण्यात आले. जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुठेही कोळी समाजाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. मला सर्व समाज, जाती धर्मालासोबत घेऊन शहराचा विकास करायचा असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
जळगाव शहरात अनेक समस्या असून १० वर्षात त्या सुटलेल्या नाही. मी आजवर शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला. अनेकांना विद्यमान आमदार नको होते मात्र उमेदवार नागरिकांवर थोपवण्यात आला. माझा निर्णय ठाम असून पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केल्यास मी त्यांची माफी मागून जळगावकरांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे डॉ.सोनवणे यांनी जाहीर केले.