
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्र प्रगतीचे शिखर गाठत असताना, केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जळगाव जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक भव्य जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून खास ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार स्मिताताई वाघ यांच्या विशेष पुढाकाराने आणि दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन यांच्या वतीने सोमवार, दि.३ ते बुधवार, दि.५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ – जीएस ग्राऊंडवर हे आगळेवेगळे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय युवा व्यवहार व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये
‘एक उन्नत राष्ट्र की और…’ हे घोषवाक्य घेऊन आयोजित केलेले हे प्रदर्शन तिन्ही दिवस सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. दिल्ली येथील फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्या संचालिका अखिला श्रीनिवासन यांनी या माहितीपूर्ण प्रदर्शनाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात केंद्र आणि राज्यातील विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे आणि ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या त्रयींचा सुरेख संगम दर्शवणारे स्टॉल्स असणार आहेत.
या प्रदर्शनातील काही प्रमुख स्टॉल्स
* महत्त्वाचे विभाग : कृषी आणि ग्रामीण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, आयुष, महाऊर्जा, आधार.
* संशोधन आणि नियामक संस्था : जिऑलॉजिकल सव्व्हे ऑफ इंडिया, आयसीएमआर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मानक ब्युरो.
* वित्तीय आणि कॉर्पोरेट : भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI), नॅशनल फर्लीलायजर लिमिटेड, न्यू इंडिया इन्शुरन्स.
* स्थानिक प्रशासन : जळगाव महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-इनक्युबेशन सेंटर.
खासदार स्मिता वाघ यांनी जळगावकरांना पहिल्यांदाच उपलब्ध झालेल्या या ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
🔬 शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी
या प्रदर्शनाच्या निमित्ताने शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील जवळपास ८ शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे कल्पक विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प मांडले जातील. विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.






