मोठी बातमी : धुळे प्रशिक्षण केंद्रातील २०० हून अधिक पोलिसांना विषबाधा
महा पोलीस न्यूज | १५ मार्च २०२४ | धुळे येथून पोलीस विभागाशी संबंधित मोठी बातमी समोर आली असून येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून २०० पेक्षा अधिक पोलिसांना विषबाधा झाली आहे. गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सर्वांवर उपचार करण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सयाजी भामरे यांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या ६३० भावी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरुवार दि.१४ रोजी सायंकाळी या जवानांना मेसमधून डाळ, भात, बटाट्याची भाजी असे जेवण देण्यात आले. जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले. मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे तातडीने पोलिसांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
सर्वांवर रात्रीच तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहे. आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ.सय्याजी भामरे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.