मोठी बातमी : खा.रक्षा खडसेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब!
महा पोलीस न्यूज | ९ जून २०२४ | जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या खा.रक्षा खडसे यांना केंद्रीत मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी महा पोलीस न्यूजने प्रसिद्ध केले होते. आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात खा.रक्षा खडसे यांचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपला राज्यात फटका बसला असला तरी जळगाव जिल्ह्यात भाजपने आपला गड कायम राखला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप-महायुतीच्या ८ पैकी केवळ २ जागा जळगावात निवडून आल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्राला दोनदा संधी
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजप सरकारने दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद दिले होते. तत्पूर्वी २०१४ च्या निवडणुकीनंतर धुळे लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ.सुभाष भामरे यांना देखील केंद्राने मंत्रीपद दिले होते. काँग्रेस सरकारच्या काळात नव्हे तर भाजप सरकारच्या काळात उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली असे बोलले जात होते. नाशिक आणि धुळेनंतर जळगावचा नंबर लागेल असे बोलले जात आहे.
..म्हणून जळगावची लागेल वर्णी
नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही आजी-माजी मंत्री पराभूत झाल्याने जळगावच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रावेरच्या खा.रक्षा खडसे यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. महाराष्ट्रात पंकजा मुंडे, हिना गावीत यांचा देखील पराभव झाल्याने महिला खासदार म्हणून उत्तर महाराष्ट्रात भाजपचा गड राखल्याने रावेरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिपदाची शक्यता अधिक
जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्यातच एकनाथराव खडसे देखील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. दुसरीकडे राज्यात आणि देशात विनोद तावडे यांचे वाढते महत्व देखील खडसेंना अनुकूल आहे. दोघांचे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने खा.रक्षा खडसे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे.
आज सायंकाळी शपथविधी
मोदी सरकार ३.० चा शपथविधी आज रविवारी सायंकाळी दिल्लीत पार पडणार आहे. खा.रक्षा खडसे यांना केंद्रीय राज्यमंत्री नव्हे तर थेट केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. रक्षा खडसेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन देखील आल्याची चर्चा असून सायंकाळी जळगाव जिल्ह्यात जल्लोष होणारच असे समर्थक सांगत आहे.