मोठी बातमी : भुसावळ डबल मर्डर प्रकरणी एकाला नाशिकात शस्त्रांसह पकडले
महा पोलीस न्यूज | ३० मे २०२४ | भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची बुधवारी रात्री गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली होती. गुरुवारी याप्रकरणी माजी नगरसेवकसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राजू सूर्यवंशी आणि विनोद चावरिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अवघ्या काही तासानंतर करण पथरोड याला नाशिकमध्ये शस्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे.
भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या मरीमाता मंदिराजवळ दीपक धांडे यांच्या कार्यालयाजवळ बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चारचाकीने जात असलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला होता. पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच तपासचक्रे फिरवण्यात आली होती.
गुरुवारी सकाळी मिथुन बारसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक राजू सुर्यवंशीसह शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडीत, करन पथरोड, नितीन पथरोड, बंटी पथरोड यांच्यासह २-३ अनोळखी इसमविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.
जिल्ह्यातील गंभीर घटना असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक आणि इतर प्रभारी अधिकारी संशयितांच्या शोध घेत होते. दरम्यान, संशयीत आरोपी राजू सूर्यवंशी हा चारचाकी वाहनाने गुजरात जात असताना त्याला साक्री जि.धुळे येथे एका हॉटेलवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच विनोद चावरिया याला देखील दुपारी ताब्यात घेण्यात आले होते.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील संशयीत करण पथरोड हा नाशिक शहरात असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शोध शाखेच्या पथकाने करण पथरोड याला द्वारका परिसरातून ताब्यात घेतले आहे. करनच्या ताब्यात दोन पिस्तोल मिळून आल्याची माहिती आहे. मयत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.