मोठी बातमी : मंगळवारी झालेली UGC-NET परीक्षा रद्द, CBI करणार चौकशी
महा पोलीस न्यूज । १९ जून २०२४ । देशात अगोदरच NEET परीक्षेवरून वादंग उठलेले असतांना आणखी एक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने मंगळवारी घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द केल्याची घोषणा बुधवारी रात्री केली आहे. परीक्षेमध्ये अनियमितता झाल्याचे कारण पुढे येत आहे. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला पाचारण करण्यात आलेले असून ते चौकशी करणार आहे.
दरम्यान, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून २०२४ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जून २०२४ रोजी देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये UGC-NET जून २०२४ आयोजित केलेली होती. एनटीएकडून ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये पेन आणि पेपर या पारंपारिक पद्धतीने आयोजित केली होती.
दि.१९ जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून काही इनपूट प्राप्त झाले होते. त्यानुसार मंगळवारच्या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा नव्याने परीक्षा होणार असून त्याची माहिती स्वतंत्रपणे उमेदवारांना दिली जाणार आहे.
मंगळवार दि.१८ रोजी यूजीसी नेट परीक्षा देशभरातील ३१७ शहरांमधील १२०५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी ११,२१,२२५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. परीक्षेला जवळपास ८१ टक्के उमेदवार उपस्थित होते. नेट परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते ६ अशी होती. एनटीएने एकाच दिवसात सर्व ८३विषयांसाठी परीक्षा घेतली होती.