सहस्त्रलिंग शिवारात मोठी कारवाई, ९१ किलो गांजाची रोपे हस्तगत
महा पोलीस न्यूज | ११ एप्रिल २०२४ | रावेर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली असून तब्बल ९१ किलो ४०० ग्रॅम वजनाची गांजाची रोपे जप्त केली आहेत. सहस्त्रलिंग शिवारात पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ६ लाख २१ हजार २५० रुपये आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व आरोपींना पकडण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. रावेर पाल रोडवर असलेल्या सहस्रलिंग लालमातीच्या शेतात गांजेची लागवड करण्यात आली असल्याची माहिती बुधवारी रावेर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना खबर मिळताच लागलीच पथकाने त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकला.
पथकाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर सहस्रलिंगाच्या शेतात छापा टाकला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अक्रम कासम तडवी, शाहरुख कासम तडवी, दोघे रा.सहस्रलिंग ता.रावेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व गांजाची रोपे शेतातून उपटून टाकली.
त्या रोपांचे वजन तहसील कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, दोन पंच व छायाचित्रकार यांच्या समक्ष केले असता त्यांचे वजन सुमारे ९१ किलो ४०० ग्रॅम असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व झाडे जप्त करून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या पथकाने केली कारवाई
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, सचिन नवले, ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर, मुकेश मांडे, महेश मोगरे, विकरुद्दीन शेख, प्रमोद पाटील, समाधान ठाकूर, सचिन घुगे, सुकेश तडवी, संभाजी विजागरे यांनी केली आहे.