योगेश चौधरी यांची भाजपाच्या नालासोपारा शहर पश्चिम मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड

अमळगावचा अभिमान – भगवान लाला चौधरी यांचे सुपुत्र यशस्वी राजकारणात पदार्पण
अमळनेर (पंकज शेटे) अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील सुपुत्र आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले भगवान लाला चौधरी यांचे चिरंजीव योगेश भगवान चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या नालासोपारा शहर पश्चिम मंडळाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीमुळे संपूर्ण अमळगाव गावात आनंदाचे वातावरण असून चौधरी कुटुंबाचा सन्मान वृद्धिंगत झाला आहे.
सध्या व्यवसायानिमित्त नालासोपारा-विरार येथे स्थायिक असलेले योगेश चौधरी यांनी गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात व पक्ष संघटनात आपली सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा गौरव करत नालासोपारा-विरार मतदारसंघाचे आमदार मा. राजन नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष सौ. प्रज्ञाताई पाटील आणि मंडळ अध्यक्ष सतीश शिर्से यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना योगेश चौधरी म्हणाले, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून, पक्षाच्या धोरणांनुसार लोकसेवेचा अधिकाधिक विस्तार करण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा व मतदारसंघातील जनतेचा आभारी आहे.”
त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार मा. शिरीषदादा चौधरी, समस्त तेली कल्याणकारी बहुद्देशीय संस्था, अमळगाव, महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ (अमळनेर), तसेच अमळगाव ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.