हॉटेल खून : मुख्य संशयिताला शनिपेठ पोलिसांनी अमळनेरहून पकडले

महा पोलीस न्यूज | २४ मे २०२४ | जळगाव शहरातील कालिंका माता मंदिराजवळ असलेल्या हॉटेल भानूमध्ये किशोर सोनवणे या तरुणाचा खून करण्यात आला होता. शनिपेठ पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप ५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयीत रुपेश सोनार याला शनिपेठ पोलिसांनी अमळनेर येथून अटक केली आहे.
शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे यांचा बुधवारी रात्री खून झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये किशोरचे वडिल अशोक श्रावण सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रुपेश मनोहर सोनार, निलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे, आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे (सर्व रा. मोहन टॉकीज परिसर, आसोदा रोड, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव ता. जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (श्रीराम कॉलनी, जळगाव) यांच्यासह अनोळखी तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिसांनी प्रशांत सुभाष काकडे (वय ३०), रुपेश सुभाष काकडे (वय २७), ईश्वर सुभाष काकडे (वय २३), मयूर विनोद कोळी ( वय २१, सर्व रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव) या पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. अटकेतील सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्ह्यातील मुख्य संशयीत रुपेश मनोहर सोनार वय-३२ हा गुजरात राज्यातून अमळनेर येथे येणार असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. शनिपेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील पोलीस नाईक किरण वानखेडे, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, गजानन वाघ यांनी गुप्त माहितीवरून रूपेश सोनार याच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्यातील काही संशयीत अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.