चोपड्यात अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारातून झाली गर्भवती ; आरोपीला अटक

चोपड्यात अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारातून झाली गर्भवती ; आरोपीला अटक
चोपडा प्रतिनिधी I शिरपूर तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोपडा येथे गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघड झाले आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे तिला दवाखान्यात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील ही अल्पवयीन मुलगी चोपड्यात बारावीच्या वर्गात शिकत आहे. अविनाश वेस्ता पावरा (रा. अंमलवाडी, ता. चोपडा) या तरुणाने जानेवारी २०२३ पासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या मैत्रिणीच्या चोपडा येथील रूमवर चार वेळा आणि २६ जून २०२५ रोजी हरेश्वर मंदिरामागे झाडाझुडपांमध्ये त्याने अत्याचार केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी अविनाश पावरा याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ च्या कलम ४, ५(१)(२), ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






