RTO अधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना रंगेहाथ अटक

RTO अधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना रंगेहाथ अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नाशिक,;- नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) मोटार वाहन निरीक्षकासह दोन खाजगी व्यक्तींना मालवाहू ट्रेलर चालकाकडून ५०० रुपये लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शिरपूर (देवरी) येथील RTO तपासणी नाक्यावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भंडारा-देवरी मार्गे रायपूरकडे जाणाऱ्या तक्रारदाराच्या मालवाहू ट्रेलरला शिरपूर (देवरी) येथील RTO तपासणी नाक्यावर थांबवण्यात आले. यावेळी खाजगी व्यक्ती नरेंद्र मोहनलाल गडपायले (वय ६३, गोंदिया) याने ‘एन्ट्री’च्या नावाखाली ५०० रुपये लाचेची मागणी केली. त्याने ही रक्कम स्वीकारून दुसऱ्या खाजगी व्यक्ती आश्लेष विनायक पाचपोर (वय ४५, अमरावती) याच्याकडे सुपूर्द केली. आश्लेषने लाचेची रक्कम असल्याचे माहिती असतानाही ती स्वीकारली.
ही संपूर्ण कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीण येथील मोटार वाहन निरीक्षक योगेश गोविंद खैरनार (वय ४६) यांच्या मौखिक आदेशानुसार आणि संमतीने झाल्याचे उघड झाले. खैरनार हे ‘इंटरसेप्टर – ५’ रस्ता सुरक्षा पथकात कार्यरत असून, त्यांनी शासकीय पदाचा गैरवापर करत खाजगी व्यक्तींमार्फत लाच गोळा केल्याचा आरोप आहे.
योगेश गोविंद खैरनार (वय ४६) – मोटार वाहन निरीक्षक, RTO नागपूर ग्रामीण , नरेंद्र मोहनलाल गडपायले (वय ६३) – खाजगी नोकरी, गोंदिया , आश्लेष विनायक पाचपोर (वय ४५) – खाजगी नोकरी (ड्रायव्हर), अमरावती अशी आरोपींची नावे आहेत .
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सापळा पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी केले, तर पोलीस हवालदार गणेश निंबाळकर आणि पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तिन्ही आरोपींविरुद्ध देवरी पोलीस ठाणे, जिल्हा गोंदिया येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने RTO कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पुढील तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.