3 हजाराची लाच भोवली, एरंडोलचा हवालदार धुळे एसीबीच्या जाळ्यात!

महा पोलीस न्यूज । दि.१७ ऑक्टोबर २०२५ । एरंडोल पोलिस ठाण्यातील हवालदार बापू लोटन पाटील यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी या हवालदाराने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. या कारवाईमुळे स्थानिक पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका अपघातप्रकरणी जप्त करण्यात आलेली दुचाकी सोडवून देण्यासाठी हवालदार बापू लोटन पाटील (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. स्वतः अपघातात जखमी झालेल्या या तक्रारदारासोबत तडजोडीअंती हवालदाराने ३ हजार रुपये घेण्याचे निश्चित केले.
सापळा रचून अटक
तक्रारदाराने याबाबत धुळे येथील एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार, ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने एरंडोल हायवे चौफुली येथे हवालदार पाटील यांना लाचेची रक्कम देण्यासाठी बोलावले. यावेळी, धुळे एसीबीच्या पथकाने सापळा रचून हवालदार बापू पाटील यांना ३ हजार रुपये स्वीकारताना जागीच पकडले.
या घटनेनंतर संशयीत आरोपी हवालदार बापू पाटील यांना पुढील चौकशीसाठी धुळ्याला नेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.






