Other

ब्रेकींग : कन्नड घाटात थरार, नियंत्रण सुटले एसटी बस कठड्याला अडकली; ५९ प्रवाशी बालंबाल बचावले!

स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटले; चार प्रवासी किरकोळ जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कन्नड घाटात स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटल्याची थरारक घटना रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. नियंत्रण सुटलेली बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवाशांचा जीव वाचला असून चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच.४०.एन.९७२६ ही छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे प्रवाशांना घेऊन जात होती. कन्नड घाटातून बस जात असताना अचानक बसचा स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

अचानक नियंत्रण सुटल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. मात्र, बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. बस कठड्यापलीकडे जाऊन खोल दरीत कोसळली असती, तर ५९ प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे दैव बलवत्तर म्हणूनच या भीषण दुर्घटनेतून सर्व प्रवासी बचावल्याची भावना व्यक्त होत आहे.

या घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

कन्नड घाटातील या घटनेमुळे एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसचा स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटण्यामागील नेमके कारण काय, बसची यापूर्वी तपासणी झाली होती का आणि वाहन रस्त्यावर सोडण्यापूर्वी त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. सुदैवाने यावेळी मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा तांत्रिक त्रुटींकडे वेळीच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button