Crime

इंस्टाग्रामवरील मेसेजवरून तरुणाचा संताप; गॅरेज चालकावर चाकूहल्ला

इंस्टाग्रामवरील मेसेजवरून तरुणाचा संताप; गॅरेज चालकावर चाकूहल्ला

भडगाव (प्रतिनिधी) :
इंस्टाग्रामवरील मेसेजचा राग मनात धरून बाळद येथील एका तरुणाने गॅरेज चालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी महेश विश्वनाथ पाटील (वय २७, व्यवसाय- गॅरेज काम, रा. बाळद बु., ता. पाचोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गॅरेज उघडत असताना बाळद खुर्द येथील विवेक शंकर कोळी याने त्यांच्यावर चाकूने पाठीवर, मांडीवर आणि डोक्यावर वार केले. तसेच “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.

या हल्ल्यामागील पार्श्वभूमी अशी की, विवेक कोळीचा भाऊ प्रविण कोळी व त्याची पत्नी योगिता यांच्यात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वाद झाला होता. त्यानंतर योगिता कोळी आपल्या मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. काही दिवसांनी प्रविण कोळी मुलींना परत घेऊन घरी आला. यानंतर योगिता कोळी हिने महेश पाटील यांच्याशी फोन व इंस्टाग्राम मेसेजद्वारे संपर्क साधून मुलींच्या स्थितीची चौकशी केली होती. हे मेसेज विवेक कोळीला कळल्याने त्याच्या मनात राग निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी विवेक शंकर कोळी (रा. बाळद खुर्द, ता. भडगाव) याच्याविरोधात भडगाव पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान कलम ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२) आणि शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button