जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीसाठी चाळीसगाव ठरणार केंद्रबिंदू – आमदार मंगेश चव्हाण

जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीसाठी चाळीसगाव ठरणार केंद्रबिंदू – आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव (प्रतिनिधी): जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येक नागरिक, शेतकरी, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी योगदान द्यावे लागेल. या उद्दिष्टाकडे मी संधी म्हणून पाहतो असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चाळीसगाव हा केंद्रबिंदू ठरेल, असे मत आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
चाळीसगाव हे छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने व्यापार व वाहतुकीसाठी महत्त्वाचे केंद्र ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. धुळे-नरडाणा रेल्वे मार्गासोबतच प्रस्तावित चाळीसगाव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गामुळे औद्योगिक व व्यापारी देवाणघेवाण वेगाने होईल. याशिवाय दोन राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून गेल्याने रस्ते वाहतुकीचे व लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम बनले आहे. या सुविधा गुंतवणूकदार व नव्या उद्योगांना आकर्षित करणाऱ्या ठरतील, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
पर्यटन विकासावर भर
चाळीसगाव मतदारसंघ पर्यटन क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. पाटणादेवी येथे पर्यटन विकास योजनेतून भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर उभारण्याचे काम सुरू असून वेरूळ-अजिंठा मार्गे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ चाळीसगावकडे वळवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यातून स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
शेती व उद्योगांना चालना
वरखेडे धरण पूर्णत्वास आल्यानंतर आठ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल. बंदिस्त पाटचारीच्या अंतिम टप्प्यातील कामामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे. कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, निर्यात केंद्र यांना चालना देण्याचे ध्येय असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. डी-प्लस झोनच्या निर्णयामुळे चाळीसगावात नव्या उद्योगांची भर पडेल. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, गुंतवणूकदार व स्थानिक उद्योजक यांच्यात समन्वय साधण्यात येणार असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.






