चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी, ७ लाखांचा गुटखा जप्त

महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । चाळीसगाव शहर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमास मालासह जेरबंद केले आहे. ही कारवाई चाळीसगाव शहरातील हीरापूर रोड, नवजीवन सुपर शॉपी समोर घडली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ लाख १९ हजार २९ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ८ लाखांचे वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक अमोलकुमार माने यांना नागद गावाकडून चाळीसगावकडे गुटख्याने भरलेली महिंद्रा कंपनीची बुलेरो मालवाहू गाडी येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार आशुतोष सोनवणे, रविद्र बच्छे, समाधान पाटील यांनी तातडीने कारवाईचा प्लॅन आखला. वाहन क्रमांक एमएच-४१-एयू-३२१० असलेली गाडी थांबवून तपास केला असता, त्यात गुटख्याने भरलेल्या गोण्या मिळून आल्या.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी तातडीने औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून सविस्तर पंचनामा केला. या कारवाईत ७,१९,०२९ रुपये किमतीचा गुटखा आणि ८,००,००० रुपये किमतीचे वाहन (एमएच-४१-एयू-३२१०) अशा एकूण १५,२९,०२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक अरबाज इब्राहिम पठाण (रा. सार्वे, ता. पाचोरा) आणि गुटख्याचे मालक दीपक वेदमुथा (रा. नागद, जि. संभाजी नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पगार यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ३०६/२०२५, भा. द. वि. संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, अन्न सुरक्षा कायदा २००६ चे कलम २६ (२) आय (१), २६ (२) १४, २७ (१), (३), (डी), (ई) वगैरे अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि पोहेकॉ राकेश पाटील हे करीत आहेत.
पथकात यांचा होता समावेश
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोलकुमार माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलिस अंमलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रविद्र बच्छे, समाधान पाटील आणि गुन्हे शोध पथकाने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला ०२५८९-२२२०७७ कळवावी.