मोठी बातमी: खातेवाटपावरून नाराजी नाट्य : महायुतीची बैठक रद्द
एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना
मुंबई वृत्तसंस्था:- महाराष्ट्रात महायुतीने एक हाती सत्ता मिळवल्यानंतरही मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. मात्र काल दिल्ली येथे अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर चर्चा करण्यात येऊन आज महायुतीच्या राज्यातील नेत्यांची खाते वाटप संदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळावी अशी आग्रही मागणी शिवसेनेकडून होत असल्याने आणि त्यातच अचानक एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याचे वृत्त इंडिया टुडे ने दिल्यानुसार आजची बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्लीतून आज अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबई परतले होते. आज मंत्रिमंडळ आणि खातेवाटप संदर्भात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली असून मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजप पक्षाश्रेष्ठींवर सोपवल्यानंतर शिवसेनेकडून गृहमंत्री पदावर दावा केला जात असल्याचे बोललेले जात आहे.
याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी गृह खाते एकनाथ शिंदे यांना सोपवावे अशी मागणी केली होती. दुसरीकडे भाजप गृह खाते स्वतःजवळच ठेवण्यास इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे गृह खात्याच्या शिवसेनेच्या मागणीवरून पुन्हा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.