महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : क्रिकेट बेटिंग घेणाऱ्यांवर एलसीबीचा भुसावळला छापा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील काही दिग्गज प्रतिष्ठित व्यक्ती ऑनलाईन क्रिकेट बेटिंग करीत असल्याचे वृत्त महा पोलीस न्यूजने प्रसिद्ध केले होते. महा पोलीस न्यूजचे वृत्त खरे ठरले असून जळगाव एलसीबीच्या पथकाने भुसावळ शहरात छापा टाकून दोघांना पकडले आहे. भुसावळ शहरात कारवाई झाली असल्याने जळगाव शहरातील बुकी चांगलेच धास्तावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा (बेटिंग) खेळणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई करत १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे रविवार, दि. २१ रोजी करण्यात आली.
नवजीवन सोसायटीत केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील नवजीवन सोसायटीत राहणारा प्रकाश हुंदामल सारडा हा त्याच्या घरी इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळवत असल्याचे समजले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह छापा टाकला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
पथकाने केलेल्या कारवाईत प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) आणि रणजीत चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपती नगर, जळगाव) हे दोघे ऑनलाइन सट्टा खेळवताना आढळले. त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस क्रमांक ४५८/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, पोलीस हवालदार उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, महिला पोलीस हवालदार दर्शना पाटील आणि चालक पोलीस हवालदार भरत पाटील यांनी सहभाग घेतला.






