श्री दत्त कॉलनीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट ; मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष, नागरिक संतप्त

श्री दत्त कॉलनीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट ; मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष, नागरिक संतप्त
जळगाव प्रतिनिधी शहरातील नीळकंठेश्वर महादेव मंदिर परिसर व श्री दत्त कॉलनी भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी याबाबत पाच दिवसांपूर्वी लेखी निवेदन देऊनही, अद्याप एकाही अधिकाऱ्याने किंवा मनपा कर्मचाऱ्याने या भागाची पाहणी केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक, महिला यांना दररोज रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, सुमारे तीन फूट खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच एका विद्यार्थ्याच्या दुचाकी वाहनाने पाण्यात अडकून बंद पडल्याचा प्रकार घडला. यामुळे त्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे हाल सुरुच आहेत.
मनपा प्रशासनाकडे सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष
या पार्श्वभूमीवर जळगाव महानगराध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे निलेश बाविस्कर यांनी मनपाच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केला आहे. “जर प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नाची दखल घेतली नाही, तर आम्ही मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण करण्यास बाध्य होऊ,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
नागरिकांतूनही तीव्र भावना व्यक्त होत असून, “दरवर्षी आम्हाला गाणी, चिखल आणि पाण्यात दिवस काढावे लागतात. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






