जळगावात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना, नवीन चेहऱ्याची चर्चा!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कुणाला रिंगणात उतरावयाचे यावर एकमत झालेले नाही. अनेक महिन्यांपासून तयारीत असलेल्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि विष्णू भंगाळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव शहरातुन उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून मुंबई वाऱ्या सुरु झाल्या आहे. दरम्यान ठाकरे गटाचे इच्छुकांनी तिकिटासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची ही भेट घेतल्याने गोंधळात भर पडली आहे. काही महिन्यांपूर्वी शरद पवार जेव्हा जळगाव शहरात आले होते त्यावेळी काही नेत्यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल याकरिता ठाकरे गटातील काही नेते प्रयत्न करीत आहेत.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचा तिढा अद्याप कायम असून उमेदवार कोण हे ठरत नाही. मुळात चिन्ह कोणते हेच निश्चित होत नाही. जळगाव शहर आणि ग्रामीणची ही अडचण आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातून जयश्री महाजन, कुलभूषण पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्या नावाची चर्चा होती मात्र आता अचानक विष्णू भंगाळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.