Detection

चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर पोलीस-चोरट्यांचा सिनेस्टाईल थरार, वाहने उलटली अन्..

महा पोलीस न्यूज । २७ जुलै २०२४ । चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर गुरुवार दि.२५ जुलै रोजी मध्यरात्री डिझेल चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग करताना सिनेस्टाईल थरार रंगला. चोरट्यांना ओव्हरटेक केल्यावर त्यांनी पोलिसांच्या वाहनाला दिलेल्या धडकेत भडगाव पोलिसांचे वाहन उलटले. तर चोरट्यांच्या वाहनाचीही विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. अपघातात ४ पोलीस कर्मचारी यांचेसह २ नागरिक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदार आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे आणि पवन पाटील असे तिघे दि.२५ जुलै रोजी रात्री शासकीय वाहनाने गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना चारचाकी क्रमांक एमएच.०४.एफए.३०४४ ही हिरापूर रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत फिरतांना आढळून आली. पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी पळ काढला म्हणून पथकाने त्या वाहनाचा पाठलाग केला. पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी वाहन भरधाव वेगाने भडगावच्या दिशेने पळवले. संशयास्पद वाहन भडगावच्या दिशेने पळून गेल्याने याबाबतची माहिती भडगाव पोलिसांना कळवण्यात आली.

कारचा युटर्न आणि मुख्य रस्त्यावर केली नाकाबंदी
भडगाव पोलीस स्टेशनच्या रात्रगस्तीवरील कर्मचारी चालक संदिप सोनवणे, पो.ना. मनोहर पाटील, पो.ना.किरण पाटील यांनी या वाहनाचा अटकाव करण्याचा प्रयत्न केला. भडगाव येथे देखील पोलीस आपल्या मागावर असल्याचे दिसताच संशयित वाहनचालकाने यु टर्न घेत वाहन पुन्हा चाळीसगावच्या दिशेने वळविले. संशयीत वाहन पुन्हा चाळीसगाव शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच त्याचा अटकाव करण्यासाठी कजगाव नाका (भडगाव पो.स्टे.), पातोंडा गाव, खरजई नाका (चाळीसगाव पो.स्टे.) याठिकाणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार शशीकांत महाजन, पो.ना.महेंद्र पाटील, भुषण पाटील, पो.शि.राकेश महाजन, समाधान पाटील, विजय पाटील, पो.कॉ. सतीष पाटील व पोहेकॉ नितेश पाटील, पो.कॉ. विजय महाजन यांनी नागरिकांच्या मदतीने बॅरीकेट्स लावून नाकाबंदी केली.

बॅरिकेट्स उडवून काढला पळ, वाहनाला धडक..
भरधाव वेगातील वाहन चालकाने बॅरिकेट्स तुडवून नाकाबंदीवरील कर्मचा-यांच्या दिशेने त्यांच्या जिवीताची पर्वा न करता वाहन सुरूच ठेवले. घटनास्थळी हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी वेळीच प्रसंगावधान राखत ते बाजुला झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र ते जखमी झाले. चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात भडगाव व चाळीसगाव शहर पोलिसांनी शासकीय वाहनाने पाठलाग सुरू ठेवला. भडगाव पो. स्टे. चे पोलीस अंमलदार संदिप सोनवणे, मनोहर पाटील यांनी जिवाची पर्वा न करता ओव्हरटेक करुन संशयीत कार चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी पोलीस कर्मचा-यांना जीवे ठार मारण्याची चिथावणी दिली आणि भडगाव पोलिसांच्या ताब्यातील सरकारी वाहनास मागून जोरदार धडक दिली. धडकेने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ते रस्त्यावर उलटून अपघातग्रस्त झाले. यामुळे संशयीत कार चालकाचे देखील त्याच्या ताब्यातील वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावरील विजेच्या पोलवर जावून आदळले.

तिघांना केली अटक, गुन्हा दाखल
पोलिसांनी कार चालक व त्याच्या दोघा साथीदारांना पळून जाण्याची संधी न देता त्यांच्या मागावरील चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडण्यात यश मिळवले. आकाश बाळासाहेब कुडे (रा. कोराडे ता. राहता जि. अहमदनगर), मनोज अशोक वाघमारे (रा. कालीका नगर, शिर्डी जि. अहमदनगर), आणि रशिद रफिक पठाण (रा. वाकळी ता. राहता जि. अहमदनगर) अशा तिघे संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्या कारची झडती घेण्यात आली असता त्यात चोरीचे डीझेल भरण्यासाठी लागणारे ८ रिकामे ड्रम, डिझेल काढण्यासाठी लागणारे २ पाईप आदी साहित्य आढळून आले. भडगाव पो. स्टे. चे पोलिस नाईक मनोहर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधिक्षकांनी केले कौतूक
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील व भडगांव पोलीस स्टेशनचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व पोहेकॉ राकेश पाटील हे पुढील तपास करत आहेत. या घटनेत भडगाव पो. स्टे. शासकीय वाहन उलटल्याने अपघातग्रस्त झाले आहे. वाहनातील भडगाव पो. स्टे. चे अंमलदार मनोहर पाटील, पो.कॉ. संदिप सोनवणे तसेच चाळीसगाव शहर पो. स्टे. चे अंमलदार आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, नाकाबंदीकामी मदतीस आलेले नागरिक गणेश महाजन व यश पाटील हे नाकाबंदीचे बॅरेकेटस लागल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सर्वांचे कौतूक केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button