गोलाणी मार्केटला मनपाचा दणका; अतिक्रमण, थकीत भाडे आणि अस्वच्छतेवर कठोर कारवाईचे आदेश


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात रविवारी सकाळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त मा. श्री. आदित्य जिवने (भा.प्र.से.) यांनी संपूर्ण मार्केट परिसराची पाहणी करून स्वच्छता, वाढीव अतिक्रमण, अनधिकृत फलक तसेच गाळेधारकांच्या विविध समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पाहणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गोलाणी मार्केट परिसरात दुकानांसमोरील वाढीव अतिक्रमण, ओटे, अनधिकृत बोर्ड आणि फ्लेक्स यामुळे नागरिक व ग्राहकांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत आयुक्त जिवने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. अतिक्रमण, ओटे, अनधिकृत बोर्ड व फ्लेक्स हटवून संबंधितांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
थकीत भाडे वसुलीसाठी गाळेधारकांना इशारा
गोलाणी मार्केटमधील ज्या गाळेधारकांकडे महानगरपालिकेची वसुली अथवा भाड्याची रक्कम थकीत आहे, त्यांनी तातडीने थकीत रकमेचा भरणा करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. थकीत रक्कम न भरणाऱ्या गाळेधारकांविरोधात नियमानुसार गाळे सील करण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे गोलाणी मार्केटमधील थकीत भाडे वसुलीचा प्रश्नही आता महापालिका प्रशासनाच्या रडारवर आला असून, आगामी काळात थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
केबल वायर आणि अनावश्यक साहित्य हटविण्याचे आदेश
मार्केट परिसरातील विविध ठिकाणी लोंबकळणाऱ्या अथवा अस्ताव्यस्त असलेल्या केबल वायर तसेच सार्वजनिक जागेत ठेवण्यात आलेले अनावश्यक साहित्य यामुळे नागरिकांना व ग्राहकांना त्रास होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. हे साहित्य तातडीने हटवून सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या. मार्केटमधील सार्वजनिक जागा कोणत्याही प्रकारे अडविली जाऊ नये आणि नागरिकांना मुक्तपणे ये-जा करता यावी, यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
दुकानासमोर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
गोलाणी मार्केट परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक गाळेधारक आणि नागरिकांचीही आहे, असे आयुक्त जिवने यांनी स्पष्ट केले. दुकानासमोर अथवा सार्वजनिक परिसरात कचरा टाकणाऱ्या गाळेधारकांवर घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा आणि कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गोलाणी मार्केटला स्वच्छ, सुव्यवस्थित करण्याचा महापालिकेचा निर्धार
गोलाणी मार्केट परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, थकीत वसुली, अनधिकृत फलक व फ्लेक्स हटविणे तसेच सार्वजनिक जागा अडथळेमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त आदित्य जिवने (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत.
या पाहणीमुळे गोलाणी मार्केट परिसरातील व्यापारी आणि गाळेधारकांमध्ये प्रशासनाच्या आगामी कारवाईबाबत गांभीर्य निर्माण झाले असून, येत्या काळात अतिक्रमण निर्मूलन आणि थकीत वसुलीची मोहीम अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे गोलाणी मार्केट परिसर अधिक स्वच्छ, शिस्तबद्ध, सुव्यवस्थित आणि अतिक्रमणमुक्त करण्याच्या प्रयत्नांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







