जळगाव एलसीबीत खांदेपालट, कर्मचाऱ्यांमध्ये लागली स्पर्धा!
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी बदली प्रक्रिया नुकतेच पार पडली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या एलसीबीच्या देखील बदल्या झाल्या आहेत. टीम एलसीबी मजबूत झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या कार्यपद्धतीने तपासाला गती मिळाली आहे. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ या म्हणी सारखा फंडा वापरल्याने कर्मचाऱ्यांमध्ये देखील गुन्हे शोधाची स्पर्धा लागली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनात नुकतेच पोलीस कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना मनासारखी बदली दिली असल्याने ते खूश आहेत. थोडेफार कर्मचारी हट्टावरच अडून बसल्याने त्यांच्या पदरी मात्र निराशा आली. स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे एलसीबी ही शाखा जिल्ह्यात एक प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. एलसीबीत येण्यासाठी मोठी स्पर्धा असते त्यातच काही वर्षापासून बदल्या झाल्या नसल्याने अनेक जागा रिक्त होत्या.
एलसीबीत जम्बो भरती, काहींचे हेलिकॉप्टर लँडिंग
एलसीबीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केल्या. एलसीबीत अनेक जागा रिक्त झाल्याने त्याठिकाणी तब्बल ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. एलसीबीत वर्णी लावण्यासाठी दरवर्षी वशिलेबाजी होत असते, हे सर्वांना माहिती आहे. यंदा देखील बदलीत काही कर्मचारी हे वशिल्याने आल्याची चर्चा आहे मात्र काही कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या शिफारशीने आल्याचे समजते. एकंदरीत सध्या जम्बो भरतीने टीम एलसीबी मजबूत झाली आहे.
कार्यपध्दती बदलाने सर्व लागले कामाला
स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक करताना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तात्पुरती नेमणूक दिली आहे. तसेच काम न केल्यास घरवापसीची तयारी ठेवावी, असा सल्ला वजा दमच दिला आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी देखील सर्व कर्मचाऱ्यांना एलसीबीला येतांना कामगिरी करण्याचा दावा करुन आल्याने तो सत्यात उतरवण्याच्या सूचना केल्याने सर्वच कर्मचारी कामाला लागले आहे.
तपासासाठी लागली स्पर्धा, गुन्ह्यांची होतेय उकल
एलसीबीमध्ये एरव्ही बीट मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असते मात्र सध्या गुन्हे उकल करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. एलसीबीत सध्या जुने कर्मचारी कमी आणि नवीन कर्मचारी जास्त असल्याने सर्व आपले अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या पंधराच दिवसात एलसीबीने तब्बल १० मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या तपासाच्या खेळत्या स्पर्धेमुळे जास्तीत जास्त गुन्हे उघड होण्यास मदत होणार आहे.