स्वदेशीचा स्वीकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा जळगावात शुभारंभ

जळगाव: ‘स्वदेशीचा स्वीकार – विदेशीचा बहिष्कार’ या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच जळगाव शहरात झाला. स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने, ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या निमित्ताने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. स्थानिक आमदार राजूमामा भोळे आणि स्वदेशी जागरण मंचचे देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ. युवराज परदेशी यांच्या हस्ते ही मोहीम सुरू झाली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवतीर्थ मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी, “बाजार जाऐंगे, स्वदेशी ही खरेदींगे” आणि “स्वदेशी अपनाओ, देश बचाओ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आमदार राजूमामा भोळे यांनी नागरिकांना आवाहन केले की, परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तू खरेदी करा. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि लवकरच ती दुसऱ्या स्थानावर येईल. यात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
या वेळी बोलताना, डॉ. युवराज परदेशी यांनी सांगितले की, कोणत्याही देशाचा विकास परदेशी संसाधने, आयात किंवा तंत्रज्ञानावर अवलंबून राहून होऊ शकत नाही. त्यांनी नागरिकांना Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन कंपन्यांऐवजी स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले.
जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे यांनी ‘आत्मनिर्भर भारत’साठी जळगाव जिल्ह्यातील उद्योजक कसे योगदान देत आहेत, याची माहिती दिली. तसेच, येत्या महिन्याभरात ही मोहीम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात स्वदेशी जागरण मंचचे संपर्क प्रमुख अजिंक्य तोतला, शहर संयोजक चेतन वाणी, युवा प्रमुख कल्पेश सोनवणे, भाजपचे जिल्हाप्रमुख दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, अमोल वाघ, जयेश भावसार, सुनील सरोदे, नितीन इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – या मोहिमेच्या शुभारंभासोबतच, स्वदेशी जागरण मंचतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात विदेशी वस्तूंना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
येत्या काळात, स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांच्या सहकार्याने जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.






