
स्टार्टअप उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! KCIIL मार्फत स्टार्टअप इन्क्युबेशनसाठी अर्ज आमंत्रित
जळगाव दि.६ (प्रतिनिधी) : नाविन्यपूर्ण उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, तरुण उद्योजकांच्या संकल्पनांना दिशा देऊन त्यांना यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतरित करणे, तसेच स्टार्टअप्सना स्थानिक व जागतिक बाजारपेठेत यशस्वीपणे उतरवण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यावसायिक आणि सल्लागार सुविधा उपलब्ध करून देणे हा “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव” यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले “केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस” (KCIIL) हे उत्तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित व अग्रगण्य इन्क्युबेशन सेंटर असून, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी आणि Startup India यांच्या पाठबळाने अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. हे केंद्र नाविन्यपूर्ण कल्पनांना आवश्यक त्या सर्व सुविधा, आर्थिक सहाय्य, व्यावसायिक मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्रातील नेटवर्किंग संधी प्रदान करून त्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास मदत करते. या केंद्रामार्फत कृषी व अन्न प्रक्रिया, सामाजिक नवोपक्रम, डिजिटल नवोपक्रम, आरोग्यसेवा व जैवतंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन तसेच अक्षय ऊर्जा/हरित ऊर्जा अशा विविध आणि उद्योजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या फोकस सेक्टर्समधील नवकल्पक व स्टार्टअप्सकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा किंवा तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या उद्योजकांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आणि बाजारपेठेत यशस्वीरित्या सादर करण्यासाठी KCIIL मार्फत सहकार्य उपलब्ध होईल.
अर्जदारांसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत – अर्जदाराकडे नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना असावी, त्याने कार्यरत प्रोटोटाइप किंवा एमव्हीपी (Minimum Viable Product) विकसित करण्याची क्षमता असावी, व्यवसाय वृद्धीसाठी सज्ज असणे आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
निवड झालेल्या स्टार्टअप्सना / नवकल्पकांना मिळणारे लाभ –निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उद्योजकांना Startup India Seed Fund / MSInS Seed Fund अंतर्गत आर्थिक सहाय्याची संधी उपलब्ध होईल. याशिवाय, व्यवसाय विकासासाठी आवश्यक कोवर्किंग स्पेस, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा, अनुभवी मेंटर्सकडून मार्गदर्शन, उद्योग व गुंतवणूकदारांशी नेटवर्किंगच्या संधी, तसेच कायदेशीर, आर्थिक, विपणन व बौद्धिक संपदा (IP) विषयक सल्ला दिला जाईल. याखेरीज, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सहाय्य देखील पुरविले जाईल.
अर्ज QR द्वारे ऑनलाइन सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी KCIIL कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२५७-२२५७४४८ या क्रमांकावर संपर्क साधावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० ऑगस्ट २०२५. स्टार्टअप्स/नवकल्पकांना आवाहन करण्यात येत आहे की, विद्यापीठात स्थित असलेल्या इनक्युबेशन सेंटरच्या सुविधा आणि सहकार्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन देशाच्या आर्थिक विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा.






