कापूस व्यापारी, जिनिंग चालक-मालकांनी ऑनलाईन व्यवहारांवर भर द्यावा : डॉ.महेश्वर रेड्डी
पोलिसांनी घेतली जिल्ह्यातील कापूस व्यापारी, जिनिंग चालक-मालकांची बैठक
महा पोलीस न्यूज | १२ जून २०२४ | चालुवर्षी ८ दरोड्याचे आणि ४६ जबरी चोरीचे गुन्हे घडले त्यात बहुतांश गुन्ह्यात कुठे ना कुठे कापूस व्यापाऱ्यांचा संबंध येतो आहे. कापूस व्यापारी, जिनिंग चालक-मालक यांची लूट आणि दरोड्याच्या घटना लक्षात घेता काही बाबी नेहमी एकसारख्या असल्याचे निर्दर्शनास येते. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे कार्य प्रत्येकाला करावे लागत असल्याने व्यापाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य केल्यास घटना रोखणे शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात कापूस व्यापारी, जिनिंग चालक मालक यांना लुटण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बुधवार दि.१२ जून रोजी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पोलीस मंगलम हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व कापूस व्यापारी, जिनिंग चालक-मालक यांची बैठक घेतली. बैठकीच्या व्यासपीठावर जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आदी उपस्थित होते. बैठकीला प्रत्येक उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते.
नेहमीची पध्दत, व्यक्ती, वाहन, रस्ते बदलावे
जळगाव जिल्ह्याला तीन जिल्ह्याची आणि मध्यप्रदेशची सीमा आहे. तसेच गुजरात आणि इतर काही राज्ये देखील जवळच आहेत, त्यामुळे इतर ठिकाणाहून आरोपींना येणे शक्य होते. दररोज व्यवहार करणारे व्यक्ती नेहमीचे असतात. वाहन, रस्ता एकच असतो, बऱ्याचदा रक्कम ठरलेली असते, त्यामुळे देखील आरोपींना फावले होते. व्यवहार करताना आपल्या बाबतीत असलेली माहिती शक्यतो कमीत कमी लोकांना कळवा, जेणेकरून घटना टाळणे शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सुचवले.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे चारित्र्य पडताळणी करावे
एक व्यापारी ऑनलाईन व्यवहार करतो पण इतर व्यापारी करत नसल्याने शेतकरी बांधव त्यांच्याकडे जातात, त्यामुळे देखील व्यवसायावर परिणाम होतो. सध्या प्रत्येकाचे बँक खाते असून प्रत्येक व्यापाऱ्याने ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य द्यायला हवे. बऱ्याचदा दुकानातीलच एखादा व्यक्ती आरोपींना माहिती देतो म्हणून आपण आपल्या दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी. जिनिंग मील, कापूस व्यापारी संघटनेने ऑनलाईन व्यवहार करण्याचा ठराव करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.
पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे
जिल्हास्तरावर व्यापाऱ्यांचे आणि जिनिंग चालक मालकांच्या अडचणी माहिती होण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज जे उपस्थित नसतील त्यांना सर्वांनी माहिती द्यावी. आजारापेक्षा उपाय बरा असतो म्हणूनच आपण सर्वांनी घटना घडण्याऐवजी सूचनांचे पालन करावे. पोलीस सदैव जनतेच्या सोबत होते आहे आणि राहणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आभार प्रदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले.
कापूस व्यापारी आणि जिनिंग चालक मालकांची अपेक्षा
ग्रामीण शाखा मर्यादित रक्कम देत असल्याने जळगावला यावे लागते. बँकेची बैठक घेऊन सूचना कराव्या. व्यापारी ७० टक्के व्यवहार ऑनलाइन करतात. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २ लाख रुपये देता येतात. बँकेने पैसे लवकर दिल्यास दुपारीच वाटप केले जाऊ शकते. लहान व्यापाऱ्यांना रोख पैसेच हवे असतात. गुजरात व्यापारी रोख आणि चढ्या भावाने व्यवहार करतात, त्यात हवाला रकमेचा वापर होतो, त्यामुळे देखील शेतकऱ्यांना रोख रक्कम द्यावी लागते. आज जिल्हास्तरावर ज्याप्रमाणे बैठक घेण्यात आली त्यानुसार तालुकास्तरावर देखील बैठक घेण्यात यावी. जिनिंग मालकांनी व्यापाऱ्यांना रोख रक्कम दिवस असताना लवकरात लवकर द्यावी, अशा मागण्या बैठकीत कापूस व्यापारी आणि जिनिंग चालक मालकांनी व्यक्त केली.