बसमध्ये पाकीटमारी; १५ हजारांची रोकड लांबवणारे तीन युवक जेरबंद

बसमध्ये पाकीटमारी; १५ हजारांची रोकड लांबवणारे तीन युवक जेरबंद
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव, प्रतिनिधी : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील १५ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या तिघा पाकीटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीचा योग्य वापर करून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख कलीम शेख इसाक (वय ५०, रा. यावल) हे दि. १ डिसेंबर २०२५ रोजी पत्नीच्या उपचारासाठी जळगावात आले होते. उपचारानंतर अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असताना, त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ₹१५,००० रोख रक्कम चोरी केली. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण केले तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.
तपासात रजा कॉलनी परिसरातील तीन युवकांनी ही पाकीटमारी केल्याचे उघड झाले. यामध्ये हमीद अय्युब खान (वय २२, रा. अक्सा नगर, जळगाव) , समीर खान अफसर खान (वय २२, रा. शेरा चौक, जळगाव) , शोहेब मेहमुद पटेल (वय २३, रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव) यांचा समावेश असून पोलिसांनी तिघांकडून चोरीस गेलेली संपूर्ण १५ हजारांची रोकड जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, किरण पाटील, गिरीष पाटील, प्रदिप चौधरी, विशाल कोळी यांचे योगदान होते. पुढील तपास पोहेकॉ गिरीष पाटील करीत आहेत.






