दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या हवालदारासह पंटरला अटक
धुळे एसीवीची कारवाई
चाळीसगाव – प्रतिबंधात्मक कारवाईच्या मोबदल्यात व गुन्ह्यात त्रास न होवू देण्यासाठी चार हजारांची लाच मागून पहिल्या हप्त्यापोटी दोन हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव पोलीस ठाण्यातील हवालदारासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने अटक केली. ही कारवाई मंगळवार, 12 रोजी सायंकाळी करण्यात आल्यावर खळबळ उडाली. हवालदार जयेश रामराव पवार (50, गायके नगर ,हिरापूर रोड चाळीसगाव) व खाजगी पंटर सुनील श्रावण पवार (52, न्हावे, ता.चाळीसगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत
45 वर्षीय तक्रारदार यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 सप्टेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदारावर केलेल्या प्रतिबंधक कारवाईत मदत केल्याच्या मोबदल्यात व त्यामध्ये त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात आरोपी हवालदार पवार यांनी 12 रोजी चार हजारांची लाच मागून दोन हजार रुपये रुपये पहिल्या हप्त्यापोटी स्वीकारण्याचे मान्य केले. धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून आधी खाजगी पंटराला व नंतर हवालदाराला अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात हवालदार राजन कदम, हवालदार पावरा, सुधीर मोरे, रामदास बारेला आदींच्या पथकाने यशस्वी केला.