वाळूने भरलेले ट्रॅक्टर उलटले; ट्रॉलीखाली दबून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

वाळूने भरलेले ट्रॅक्टर उलटले; ट्रॉलीखाली दबून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात वाळूने भरलेले ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॉलीखाली दबून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास तापी नदीकाठावर घडली.
मृत तरुणाचे नाव तोहीत शाह इस्माईल शाह (वय २१, रा. पिंपरीनांदू) असे आहे, तर जखमीचे नाव अनिकेत संदीप इंगळे (वय २०, रा. पिंपरीनांदू) असे आहे. या घटनेची माहिती सलीम शाह करीम शाह यांनी मुक्ताईनगर पोलिसांत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तोहीत शाह व त्याचा चुलत भाऊ सलीम शाह हे दोघे मजुरीचे काम करीत होते. सोमवारी सकाळी ते वाळू घेण्यासाठी नदीकाठावर गेले होते. वाळू भरल्यानंतर ट्रॉलीसह परत येत असताना ट्रॅक्टरचा तोल जाऊन ते पलटी झाले. त्यात तोहीत शाह ट्रॉलीखाली दबून गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून दोघांनाही बाहेर काढून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोहीत शाहला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले, तर अनिकेत इंगळे याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.






