सुनील मंत्री यांच्याकडे सायबर हल्ला, इंदू कॉम्प्युटर्स संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

महा पोलीस न्यूज | १५ जुलै २०२४ | जळगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक सुनील आर. मंत्री यांच्या कार्यालयात सायबर हल्ला झाला असून त्यामुळे सर्व डेटा हॅक होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सायबर सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर नूतनीकरणकामी पैसे देऊन देखील ते न केल्याने हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनील आर. मंत्री या संस्थेच्यावतीने दीपक वडनेरे, संचालक – इंदू कॉम्प्युटर्स, जळगाव यांच्या विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील आर. मंत्री ही संस्था ऑटोमोबाईल, मोबाईल, सरकारी कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, मालमत्ता भाडेकरार, वैद्यकीय सेवा, वेअरहाऊसिंग असा व्यवसाय करीत असतात. संस्थेचे मुख्य कार्यालय जळगाव स्थित मेहरुण शिवार गट नं. 78, प्लॉट नं. 1 एमआयडीसी येथे आहे. या मुख्य कार्यालयातील संगणकाचे देखभाल-दुरुस्ती इत्यादीची कामे दीपक वडनेरे यांची संस्था इंदू कॉम्प्युटर्स जळगाव हे करीत असतात.
संस्थेतील सर्व संगणकमध्ये ‘सोफोस सपोर्ट’ या कंपनीची फायरवॉल ही लावण्याकरिता तीन वर्षाची रक्कम दि.२ जून २०२४ रोजी रुपये ८९ हजार १३५ रुपये दीपक वडनेरे यांना दि.५ जून रोजी देण्यात आले होते. मात्र, त्यांनी फायरवॉलचे रिन्युअल अर्थात नूतनीकरण न केल्यामुळे व सुरक्षा न मिळाल्यामुळे सुनील आर. मंत्री यांच्या मुख्य कार्यालयातील संगणक प्रणालीवर सायबर अटॅक होऊन सर्व डेटा हॅक होऊन नुकसान झालेले आहे.
दि.२१ जून २०२४ पर्यंत असलेली मुदत आणि १५ दिवस अगोदर दिलेली रक्कम, नूतनीकरण न झाल्यामुळे हा सायबर हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. यासंदर्भात दीपक वडनेरे, संचालक – इंदू कॉम्प्युटर्स, जळगाव यांच्याविरुद्ध यश सुनील मंत्री यांनी तक्रार दाखल केलेली असून हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे तपास करीत आहेत.