दरोडा : चाकूचा धाक दाखवून अज्ञात चार दरोडेखोरांनी दागिन्यांसह रोकड लुटली !

दरोडा : चाकूचा धाक दाखवून अज्ञात चार दरोडेखोरांनी दागिन्यांसह रोकड लुटली !
अमळनेर शहरातील धक्कादायक घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील अयोध्यानगर भागात २५ सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास दरोड्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वेत तांत्रिक म्हणून कार्यरत दीपक पुंडलिक पाटील हे ड्युटीला गेल्यानंतर त्यांच्या घरात चार अज्ञात चोरटे घुसले. चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना दहशतीत ठेवून चोरट्यांनी कपाट उघडून सुमारे ६ तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल ४० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.






