जिल्हापेठच्या हद्दीत दर महिन्याला अवैध धंदे होतात बंद, दिपककुमार गुप्तांची तक्रार
महा पोलीस न्यूज । दि.९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या अर्जावर जिल्हापेठ पोलीस निरीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस दरमहिन्याला अवैध धंद्यांवर कारवाई करतात हे सिद्ध होत असले तरी ते सुरू असतात असे देखील त्याचा अर्थ निघतो.
जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस महासंचालकांच्या आदेशाचा संदर्भ देत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांच्या माहितीसाठी अर्ज केला होता. आपल्या हद्दीत अवैध धंदे सुरू नसल्याबाबत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षकांना प्रतिज्ञापत्र द्यायचे असते. दिपककुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती मागवली होती.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रतिज्ञापत्र ऐवजी प्रमाणपत्र सादर केले आहे. आमच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्यात आले असून माहिती मिळाल्यास त्याचे समूळ उच्चाटन करण्यात येत असल्याचे त्यांनी पोलीस अधिक्षकांना लिहून दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी त्यावर देखील टीका केली असून प्रमाणपत्र नव्हे प्रतिज्ञा पत्र हवे असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.